मी आठवीत पहिल्यांदा रात्री जागरण केलं, गृहपाठ पूर्ण करण्यासाठी! तब्ब्ल १२:३० पर्यंत जागी राहिले!
दुसऱ्या दिवशी वेळेत उठून शाळेत गेले तेव्हा एकदम भन्नाट वाटत होतं! म्हणजे आपण कसं इतरांहून काही वेगळं केलं असाच भाव होता! पुढे मग सवय झाली, अभ्यास, आवडीच्या पुस्तकाचे वाचन, उरलेले लेखन, गृहपाठ, सगळं सगळं रात्री! कॉलेज येईपर्यंत तर माझी अभ्यासाची वेळ ही रात्री आठ शिवाय सुरूच होत नसे!
त्यामुळे अगदी परीक्षा सुरु असल्या तरी संध्याकाळपर्यंत मी टिवल्या बावल्या करत असे आणि मग रात्री छान मूड लागला की झटपट अभ्यास करून लवकरात लवकर म्हणजे २:०० पर्यंत झोपून जात असे! सकाळी उठून कॉलेज आणि परीक्षा! मार्क चांगले पडत असल्याने घरच्यांचा फारसा आक्षेप देखील नव्हता आणि मी अशीच आहे, मी रात्रीच अभ्यास करू शकते हे मनाशी अगदी पक्के करून घेतले होते!
एक मात्र घोळ होता, माझे आजोबा रोज पहाटे ४:३० पर्यंत उठत, ते उठल्यावर जर मी जागी असले तर मात्र ते ओरडणार हे नक्की असे!
“आत्ता सगळी थट्टा वाटते तुला, मोठी झालीस की कळेल तुला” असे काहीसे रागात आणि तरी अतिशय कळकळीने ते सांगत असत.
मला मात्र तेव्हा मी मोठीच आहे, मला सगळं कळतं आहे, असेच वाटत राहिले!
मला सगळ्याच गोष्टीत रस होता, अभ्यास, नाच, नाटक, चित्रकला, छायाचित्रकला, भटकंती सगळेच! भाषा शिकाव्यात. खूप पुस्तकं वाचावीत, नाटक लिहावं, त्यात काम करावं, गल्लीतल्या मुलांचे नाच बसवावे! वेळ काढून कविता कराव्या आणि अगदी रात्री जागून आवडीची पुस्तकं वाचावीत! एक ना अनेक आवडी! आणि मग ह्या सगळ्या करायच्या म्हणजे वेळ कमी पडत असे! दिवसात तास तर चोवीस, आणि करण्यासाठी गोष्टी तर अगणित!
मग उपाय काय? तर दिवस काही ओढून मोठा करता येत नाही, तर आपण झोप कमी करू या! मग पाच तास झोप, चारच तास झोप असे केले तर निश्चित आपल्याला वीस तास मिळतील, मग त्यात जेवढे कष्ट घेऊ त्यातून इतरांच्या पुढे जाता येईल, मोठे आणि यशस्वी होता येईल, असे सगळे माझे बाळबोध आडाखे!
मी कशी कमी झोपेवर तरुन जाते ह्याच्याच फुशारक्या मारत असे! अर्थात, त्यांना जोड मिळाली माझ्या पहिल्या व्यवसायाची! मग काय विचारता, दिवसातले १५ तास कॉम्प्युटरसमोर ठाण मांडून बसणे आणि रात्री चार तास झोप ह्यावर मी अनेक वर्ष काढली!
झोप अर्थात येत असेच, मात्र मग तिचा उपद्रव वाटे! म्हणून मग कुठे सहज एकदा घेतलेली कॉफी, तिची सवयच झाली! अभ्यास म्हणजे संध्याकाळी उशिरा, अभ्यास म्हणजे आधी एक कडक, दुधाशिवाय, कमी साखरेची कॉफी!
शहरात नव्याने फुललेली कॉफीची सगळी नवी कोरी दुकानं होतीच, एक्सप्रेसोचा शॉट विकायला आतुर! आणि मी होतेच शोधात, झोप घालवण्याच्या जालीम उपायाच्या! मग काय! एका शॉट वरून प्रवास तब्ब्ल सात शॉट पर्यंत गेला आणि जी झोप विरली ती अगदीच गायब!
पुढे कधी एनर्जी ड्रिंक्स सापडली, मग झोप आणि तिचा उपद्रव अगदी झुरळासारखा झटकता येतो, तसेच जालीम औषध म्हणजे हे सगळे कॅफिन असलेले एनर्जी ड्रिंक्स!
एक प्रश्न माझ्या दृष्टीने सुटला होता! आता झोप काबीज केली होती, आता एक अजून बाब होतीच माझ्या सगळ्या आवडी निवडीच्या मध्ये मध्ये करत, माझी मासिक पाळी! दर महिन्याला यायची, त्याचबरोबर येणारा थकवा, चेहऱ्यावरचे फोड, कंबर दुःखी आणि संकोच! सगळेच घाऊक प्रमाणात!
एक मुलगी म्हणजे निसर्गाने देखील माझ्या विरुद्ध एखाद मोठे षडयंत्र रचले आहे! मला घरात डांबून ठेवण्यासाठी असेच वाटत असे! मी मुलगी म्हणजे कोणत्याही मुलापेक्षा अजिबात कमी नाही, हे घरच्यांनी पटवून दिलं होतंच, त्यात स्वतःचे स्वतंत्र विचार आणि तसेच वातावरण शाळा कॉलेजात! त्यामुळे येणारी पाळी मोठीच अडचण वाटे!
हे सगळेच अडथळे आहेत आणि ह्यातल्या कोणत्याच अडथळ्यांना मी बधणार नाही, त्यामुळे थांबणार नाही, मागे हटणार नाही हेच माझे धोरण होते! कुठेतरी त्वेषाने बरोबरी करायची खुमखुमी होती! सिद्ध करायचे होते, मी मुलांच्या तोडीची नसून, काकणभर अधिकच श्रेष्ठ आहे!
स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या मला शांत बसू देत नव्हती! मला थांबणे, व्यक्त होणे, हळवे होणे, वाट बघणे किंवा नमते घेणे ह्यात काडीचा रस नव्हता! सतत ती एक आतून धगधगणारी अस्वस्थ करणारी ऊर्जा मला चालवत होती! अक्षरशः पळवत होती!
मग एकदा चमत्कार झाला, माझी पाळी आलीच नाही एक महिना, मी खूषच झाले! चला कटकट गेली असेच वाटून गेले! मात्र आईने हेरले आणि सरळ डॉक्टर गाठला तिने!
डॉक्टरीणबाई देखील निवांत होत्या, होते असे कधी काही मुलींना, नाही येत एखाद महिना पाळी, मी देते औषध लिहून येईल मग असे म्हणून चक्क गर्भनिरोधक गोळ्याच लिहून दिल्या! मग काय वयाच्या सतराव्या वर्षांपासून अजून एक अवजार मिळाले, पाळी देखील माझ्या बरहुकूम येऊ लागली!
विज्ञाच्या ह्या प्रगतीची मला तेव्हा फार गंम्मत वाटली होती! पाळी पुढे मागे झालीच की लागलीच हा आसूड होता उगारायला! वर्ष जसजशी सुरू लागली तसतसे मला अगदी आता मी माझे स्वप्न साकारते आहे असेच वाटत राहिले!
व्यवसाय बहरू लागला, जिथे चार चार वर्ष इंजिनियरिंग करून माझ्या वयाची मुलं दहा पंधरा हजाराच्या नोकऱ्या करत होती, तिथे मी काही दिवसांच्या कामात त्याहून कैकपट कमवत होते! मनासारखा पैसा हातात होता आणि मला वाटलं मी आता सहज जग जिंकू शकते!
त्यात परदेश प्रवास सुरु झाला! मग काय दारू, जागरण आणि कॉफी सगळेच एकदम सुरु!
मी अगदी स्वतःच्या नजरेत कुल होते! यशस्वी होते आणि जग जिंकलेली होती!
मला सगळं तात्काळ हवं होतं, पैसा, प्रसिद्धी, यश आणि अर्थात ते यश साजरा करणारी मित्र मंडळी!
मला माझ्याच मर्यादा पार केल्याचा कोण आनंद होता! म्हणजे इतर मुली जिथे अडखळून थांबल्या, तिथे मी सुसाट निघाले होते! कोणी पाळीमुळे संकोचू लागल्या, कोणी घरच्यांच्या दबावामुळे, कोणी नोकरीत अडकू लागली, तर कोणी प्रेमात! मला मात्र ह्यातले कोणतेच बंधन नको होते, माझ्या दृष्टीने माझ्या बेफाम वेगाला लगाम घालणं पाप होतं, उलट आता घेतलीच आहे गती तर असेच पुढे पुढे जात राहू असेच वाटत राहिले!
त्या पुढे पुढे जाण्यात अनेक माणसे, त्यांचे प्रेमळ सल्ले, घरातले नियम, सगळेच मागे राहू लागले!
त्याचा देखील मला आनंदच होता, ते सगळं आऊटडेटेड होते, निरुपयोगी होते म्हणून तर मागे राहून गेले होते! जमाना तर आता बदलाचा होता! बदल हाच महत्वाचा होता आणि आता हेच मी शब्दशः जगत होते!
मी तरुण होते, उत्तम उंची, व्यक्तिमत्व लाभलेली मी एक हुशार आणि उद्धट मुलगी होते! एक उद्योजिका होते आणि त्याच बरोबर अनेक गोष्टीत रस असलेली मुलगी होते!
अजून काय हवं! वयाच्या २२व्या वर्षी मला जे जे हवं ते सगळंच मी मिळवू पाहत होते आणि ते देखील कोणाच्या मदतीशिवाय, एकटीच मला हे सगळं करायचं होतं, आणि माझ्यामते मी ते करत देखील होते!
सर्वार्थाने मी माजात जगत होते!
मी केवळ व्यावसायिक नसून मी तेव्हा मॉडेलिंग करू लागले आणि आपण छान दिसतो आणि नुसतं छान दिसण्याचे देखील पैसे मिळवतो ह्याची देखील मजा वाटत होती!
सगळे इतके मस्त, इतक्या धुंदीत सुरु होते की मध्येच आपली पाळी येते जाते, अचानक आपल्या चेहऱ्यावर फोड येतात, पाठीवर अधून मधून पुरळ येतं, केस गळू लागले आहेत आणि महिन्याचे काही दिवस मला फॉर्मल पॅन्ट घट्ट बसते आणि काही दिवस मापात बसते, ह्या असल्या फालतू गोष्टींकडे माझे अजिबात लक्ष नव्हते! तसेच मला मध्येच खूप राग येतो, अगदी अनावर राग आणि कधी आतून अगदी रडकुंडीला आलेली असते मी आजकाल, अचानक खूप दुःखी होतं मन. हे असले फालतू चोचले पुरवायला मला उसंत नव्हती की रस!
हे सगळं माझं मनोगत नाही, ही सगळी गोष्ट देखील माझ्या एकटीची नाही, ही माझ्या पिढीपासून सुरु झालेली शहरी, निमशहरी भागातील अनेको मुलींची आहे! ही गोष्ट आहे प्रत्येक मिलेनियल मुलीची! प्रत्येक पिढीची एक समान कथा आणि व्यथा असते, तशी ही कथा आमची आहे! प्रत्येक धडाडीच्या, ध्येयवेड्या मुलीची गोष्ट आहे.
हा आमच्या तारुण्याचा कैफ होता, ही त्या कैफाची गोष्ट आहे! देह, देहाची पूर्ण ओळख अजून पटायची होती, स्त्री देह ही काय किमया आहे ते उमजयचे होते, ही त्या उमजण्याची पहिली पायरी! चुका करण्याची, चुका करत आहोत, देहाची आबाळ करत आहोत हे समजून यायच्या आधीचा हा काळ! तारुण्याचा कैफ कसा उतरतो, देहातली मनहरी जादू कशी उलगडते आणि स्वास्थ्य हाच खजिना आहे ह्या देहाच्या तिजोरीतला हे समजायला अजून वेळ होता!
प्राजक्ता पाडगांवकर