नसलेल्या सवयी
माझ्या आजीच्या जगण्याला एक घट्टसर वीण होती, म्हणजे ती रोज किती वाजता उठणार हे तिचे नक्की ठरलेले होते, रोज, अनेक वर्ष ती साधारण ५ ते ५:३० च्या दरम्यान उठणार हे तिचे तिनी बहुदा ठरवलं होतं. उठल्यावर ती रोज स्वतःचे आवरून, आधी शेगडीला नमस्कार करून त्यावर एक छोटं भांडं भरून पाणी तापवत असे. ते पाणी आणि रात्री भरून ठेवलेल्या चांदीच्या तांब्यातले पाणी ती एकत्र करून पीत असे. मग ती तिचे लांबसडक केस तेल लावून नीट विंचरून घेत असे, त्याचा एक मोठाला अंबाडा घालून, खाली पडलेले केस निपटून घेऊन, ते कचऱ्यात टाकून, हात धुवून घेत असे. त्यानंतर अंघोळ, मग तुळशीला आणि इतर झाडांना पाणी, मग स्वयंपाकाची तयारी, करत करत स्वयंपाक आणि नाश्ता तयार करून ठेऊन पहिला चहा होत असे. मग पूजेची थोडी तयारी आणि नाश्ता करून जवळच्या देवळात पायी चालत जाऊन तिथे तीन ते पाच प्रदक्षिणा घालून, पुन्हा चालत घरी. मग पुन्हा थोडा चहा आणि पेपर वाचन. थोड्यावेळानी कोणी आल्या गेल्याची सरबराई आणि दुपारचे जेवण, आवरून घेऊन दुपारची थोडी झोप आणि पुन्हा उठून काही विणकाम, शिवणकाम किंवा पत्त्यांचा डाव मांडत असे. मग दुपारचा चहा किंवा उन्हाळ्यात ताक, पन्हे तत्सम. संध्याकाळी थोडी न्याहरी, अगदी नैवेद्याच्या वाटीत पुरेल इतकीच. त्यात कधी काही बाहेरचे पदार्थ, आंबट, खारट किंवा चटपटीत असेल तर अजिबात चालत नसे. पुन्हा संध्याकाळचा ताजा स्वयंपाक, जेवण, थोड्यावेळ टीव्ही आणि मग स्तोत्र म्हणून झोप.
ती आयुष्यभर अशीच जगत होती का? तर कदाचित नाही, मात्र साधारण ती माझी आजी झाल्यापासून तिच्या शेवटच्या दिवसापर्यंत थोड्या फार फरकाने ती असेच जगत होती! म्हणजे किमान ३५वर्ष ती अशीच जगत होती!
तिच्या जगण्याच्या ह्या वेगाशी माझे थोडे विचित्र नाते होते. म्हणजे ती तशी वागत राहते म्हणून माझ्या सगळ्या अवांतर जगण्याला एक चौकट मिळे मात्र तिने कधी मला दुपारी झोपायला वगैरे सांगितले किंवा वेळेत जेवायला सांगितले की माझा अगदीच पापड मोडे! मला तिचे हे जगणे जाचक वाटे! म्हणजे रोज रोज तेच तेच चक्राकार जुंपलेले असे! अगदीच करकचून कोणी आवळून घातल्यासारखे! मला मुक्त जगायचे होते, जर आजीचे सुंदर लांब केस अंबाड्यात अडकलेले होते तिच्या दिनचर्येसारखे तर माझे अगदीच मोकळे, बिनधास्त आणि कोणतेच लगाम नसलेले, माझ्या रोजच्या दिवसासारखे!
मला सगळे नवीन बघायचे होते, दुपारी न झोपता किती उपद्य्वाप करता येतात हे बघायचे होते. रोज तीच कामं करणं कमीपणाचे वाटत होते. आजीच्या ह्या दिनचर्येचा इतर कोणाला काही त्रास नसावा, असल्यास फायदा असावा बहुदा, म्हणून इतर मोठी मंडळी तिच्यासारखी किंवा तिला साजेशी दिनचर्या पळत असत. मी मात्र रात्री उशिरा नाटकांच्या तालमीवरून ये, सकाळी नऊ पर्यंत झोप, कुठे थेट जेवून मग दुपारी अंघोळ कर असे रोज भलभलते करत असे!
ह्यातून झाले हेच, की मला माझ्या दिवसातल्या तासांना काही एक वळण, शिस्त लावता येत नाही, आजवर तो झगडा सुरूच आहे. मनात येईल तेव्हा जे ते करायचे आणि रोज निराळे मनात येईल तसे वागायचे, हे लहानपणी आणि तरुणपणी अगदीच आवडीचे होते. थरारक होते! मात्र आज जेव्हा प्रत्येक सुरु केलेले डायट काही महिन्यात निकामी ठरते, प्रत्येक जिम मेम्बरशिप त्या जिमला फुकटची देणगी ठरते आणि मुलांना लावू पाहिलेल्या प्रत्येक नियमाचे पालन मीच करू शकत नाही तेव्हा जो वैताग येतो, त्यातून हा विचार सुरु झाला! काय चुकतंय माझं? माझ्यासारख्या असंख्य मुलींचं, बायकांचं? काही राहून गेलं आहे का? थोडा अजून विचार केला तर लक्षात येतं की जशा काही सवयी लागलेल्या आहेत आम्हाला तशाच काही सवयी लागल्याच नाहीत किंवा आम्ही लागू दिल्याच नाही आहेत स्वतःला!
आज त्या न लागलेल्या, नसलेल्या सवयींची ओळख करून घेऊ या!
१. एकाच वेळेवर झोपणे आणि उठणे: ऑफिस,मुलांची शाळा, घरातल्या बायकांच्या वेळा असे जर काही काही नसेल तर आपल्यातल्या किती जणी त्याच वेळेबरहुकूम रोज उठतील? आत्ता ऑफिसचा वचक, मुलांच्या शाळेचा धाक आहे म्हणून आपल्यातले बहुतांश लोक वेळेत उठून सगळे आटोपतात, मात्र हे जेव्हा काही नसेल तेव्हा एकाच वेळी उठून झोपणारी मंडळी विरळी! मात्र ह्यातून जो शरीरात हौदोस होतो, त्याची तिळमात्र कल्पना आपल्याला नसते. शरीराला जाणारे रोजचे इशारे, माहिती ह्यातून शरीराचे येणारे इशारे आणि संदेश, सगळे सगळे आपल्याला अजिबात समजत नाहीत! कुठेतरी आपण हे गृहीत धरू लागतो की वय झालं की असे होणारच! ऍसिडिटी, ब्लोटिंग, केस गळणं नॉर्मल होऊ लागलं आहे, मूड खराब होणं, अचानक जोरात ओरडून भांडावं वाटणं नॉर्मल स्वभाव वाटू लागला आहे. मात्र हे सगळं कमी किंवा अनियमित झोपेमुळे होऊ शकतं हे आपण समजून घेतच नाही आहोत का?
२. नियमित पोट साफ होणे: साधीशी गोष्ट असते, रोज एकाच वेळी किंवा उठल्या उठल्या आपला कोठा साफ होतो आहे का? प्रत्येक वेळी सौचास जाताना काही त्रास होतो आहे का? काही बदल आपल्याला त्यात जाणवत आहेत का? का कोठा जड आहे, पाइल्स झाल्या बाळंतपणात आता त्रास होणार आहेच, उलट सुलट खाल्लं की एखाद दिवसांनी कोठा साफ होणार आहे, असे म्हणून सोडून देतो आपण. मात्र हे नॉर्मल नाही, हे असे व्हायला नकोय कारण रोज एका वेळी, उठल्यावर सर्वप्रथम जर पोट साफ होत नसेल तर तो शरीराच्या पचनक्रियेतील काही बिघाड दर्शवत आहे. आणि पोटाचा आणि आपल्या भावभावनांचा अतिशय जवळचा संबंध असल्याने आपली चिडचिड, आपला वाढलेला पारा पुन्हा पुन्हा आपल्याला काही सांगू पाहत असू शकतो! त्यासाठी रोज सकाळी उठून पोट साफ होण्याची शरीराला सवय हवी.
३. दातांची/तोंडाची निगराणी: आपण उठून लागलीच दात घासतो, किंवा साधारण तशी अपेक्षा आपली सर्वांकडून असते. मात्र फक्त दात घासणे पुरेसे नाही, दातांच्या फटीत अडकलेले कण पूर्णतः काढून टाकणे, जीभ साफ करणे, तोंडातील आतील बाजू स्वच्छ करणे हे रोजच्या सवयीत आलेच, मात्र नियमितपणे दंतवैद्याकडे जाऊन दातांची तपासणी करून घेणे, दात स्वच्छ करून घेणे आणि दातांचे आरोग्य राखणे, तोंडाला जर दुर्गंध येत असेल तर त्यावर उपाय करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. दातांचे महत्व हे पचनाशी जोडलेले आहे. मुखदुर्गंधी देखील अपचन दर्शवते आणि आपली जीभ आपले पुष्कळसे आरोग्य नियमित करत असते.
४.दररोज अंघोळ करणे: अंघोळीची गोळी घेणे ही लहानपणी गमतीशीर वाटणारी गोष्ट, मात्र आमची पिढी मोठी होईस्तोवर एखाद आठवड्यात एखाद दिवस अंघोळ न करणे ही जीवनशैली होऊन गेली आहे. खूप काम आहे, आल्यावर करते, असे करत करत दिवस सरतो आणि एखाद दिवस अंघोळ राहूनच जाते, कधी कधी मूड नसतो किंवा अजून काही. मात्र रोज ऊनपाण्याने किंवा जमल्यास गार पाण्याने अंघोळ करणे ही सवय निश्चित महत्वाची आहे. अंघोळीने आपला मूड बदलतो, आपल्या शरीराच्या शुद्धीसोबत मनाचा मळभ देखील धुतला जातो. गार पाण्याने थोड्यावेळ जरी अंघोळ करता आली, तर त्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. रक्ताभिसरण नियमित होते.
५. दररोज नाश्ता करणे: रोजच्या घाई गडबडीत सकाळी फक्त चहा, कॉफी किंवा तेही न घेता घराबाहेर पडणारी असंख्य मंडळी आपल्या भोवती असतात. आपणही त्यातले एक असतो, मात्र ते तितकेसे चांगले नाही. वेळ नाही ही सबब झाली, मात्र अधिक तपासले तर आता ती सवय झालेली आहे, उपाशीपोटी घर सोडणं.
उठल्यापासून तीन तासांत पोटात काही सकस आणि शक्य असल्यास ताजा आहार गेलाच पाहिजे. रात्री झोपेत असताना शरीराने जी मेहनत केली असते, पचनक्रिया आणि इतर सर्व क्रिया नियमित करण्यासाठी, त्यानंतर शरीर ऊर्जा शोधत असते, त्याची वाट बघत असते, त्यासाठी सकस अन्न अतिशय महत्वाचे आहे. त्यावेळी जर आपण उपासमार केली शरीराची, तर शरीरातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते, सातत्याने असे केल्यास मधुमेह निश्चित संभवतो. त्यामुळे दिवसाच्या सुरवातीला काही खाऊन मगच दिवस सुरु करावा. ह्यात शक्यतो ताजे अन्न खाल्ले तर अधिक उत्तम!
६.एकाच वेळेवर जेवण करणे: बहुतांश लोक जेवणाची वेळ दिवसातल्या कामानंतरची अशी धरून चालतात. दुपारचे जेवण २, ३ वाजता, संध्याकाळचे जेवण रात्री ११ नंतर वगैरे. त्यातही दिवसातले सगळ्यात मोठे जेवण रात्री कारण तेव्हा वेळ असतो, म्हणून मग सगळे साग्रसंगीत जेवण रात्री. हे सगळे शरीराला घातक आहे. शरीराला अन्न आपल्या सोयीने न देता, त्याच्या गरजेनुसार द्यायला हवे. शरीर दिवसा काम करण्यासाठी तत्पर असल्याने, त्याच्या ऊर्जेच्या गरजा देखील दिवसा अधिक आणि रात्री कमी अशा असतात. त्यातही स्त्रियांसाठी दुसरे एक घड्याळ त्यांच्यातून काम करत असते, ते आहे महिन्याचे घड्याळ, पाळीशी बांधलेले. त्यामुळे स्त्रियांना निरनिराळ्या दिवशी, निराळ्या आहाराची गरज अधिक असते. एकसुरी, वेळीअवेळी आहार हा स्त्रियांना अधिक त्रासदायक ठरतो.
७. छंदासाठी वेळ: छंद म्हणजे अशी एखादी गोष्ट, जे करण्याचे आपल्याला कोणी पैसे दिले नाहीत, सक्ती केली नाही तरी आपण ती गोष्ट आनंदाने करू. कोणाला वाचन आवडतं, कोणाला नृत्य, कोणाला रांगोळी काढायला आवडते किंवा इतर काही. मात्र ह्या गोष्टी आपण दररोज करत नाही, कधी कधी अनेक वर्ष करत नाही. तसे न करता आपल्या आवडीची एक गोष्ट रोज करायला लागली तर त्यातून आपल्याला एक निराळी ऊर्जा एक नवचैतन्य मिळेल!
ह्या काही ठळक सवयी, ज्या आपल्याला नसतात, काहींना ह्या सातही सवयी नसतील, काहींना त्यातील काही असतील, काही नसतील. काहींना ह्या सगळ्याच असतील. मात्र ह्यातून हेच दर्शवायचे आहे की आरोग्य हे फक्त जिम करून, डायट करून असे साध्य होणारे नाही, ते त्याहून अधिक गुंतागुंतीचे आहे, मात्र ते राखण्याचे गमक सोप्पे आहे, अतिशय छोट्या तरी महत्वपूर्ण सवयी, अशा क्रिया ज्या आपण रोज करू शकतो, अनेक वर्ष, अव्याहत, अगदी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, त्या सवयी लावून घेणे! आपल्याला जर टिकून राहायचे असेल, तर आपल्या सवयी टिकवून ठेवायला हव्यात, त्याच आपल्याला तारून नेणार आहेत.
चांगल्या सवयी असतील तर गोष्ट वेगळी असेल, नाहीतर वाईट सवयी असल्यास, त्यादेखील आपल्याला एका निश्चित वाटेवर नेत आहेत हे नक्की!
आपले आजचे शरीर, त्याचे आरोग्य, आपला मूड, मानसिक स्थिती हे सगळं देखील आजवरच्या सवयींचे परिमार्जन आहे, त्यामुळे जर बदल घडवून आणायचा असेल, तर सुरवात सवयी बदलण्यापासून व्हायला हवी!
प्राजक्ता पाडगांवकर