शाळा कॉलेज होतं तेव्हापर्यंत रोजच्या दिवसाला एक जोरकस वळण होतं, शाळा अशक्य शिस्तीची असल्याने वेळेत उठणे, नीट नेटके राहणे, स्वच्छ सुवाच्य अक्षर आणि स्पष्ट आवाजात बोलणे असे सगळेच बाणवलेले होते. कॉलेजमध्ये ती शिस्त उपयोगी पडली मात्र हळूहळू तेवढी शिस्त नसली तरी अगदीच अडत नाही हेही आजू बाजूला दिसू लागले होते.
त्यातच काय “कूल” आहे, काय अगदीच “काकूबाई” आहे असे मनाशी आडाखे बांधले जाऊ लागले होतेच!
दहावीतून निघेपर्यंत काही सवयी अगदीच लागल्या होत्या!
सवय म्हणजे तरी काय! एकच कृती स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा करत राहणे, एकाच पद्धतिने निरंतर तसेच वर्तन करत राहणे!
तशा तरुणपणी मला असलेल्या सवयी आज बघितल्या तर मोठीच उकल होते, अनेक गोष्टींची आणि त्या सवयींच्या परिणामाची!
१. झोप कमी घेणे: झोप म्हणजे कामात खोळंबा, झोप म्हणजे अळशीपणा, झोप म्हणजे व्यत्यय आणि झोप काही गरजेची नसतेच, असेच मला वाटत असे. त्यातच घरी मोठ्या लोकांचे त्यांच्या तरुणपणीचे नाटकांच्या तालमी, उशिरा जागून सिनेमे बघणे आणि असे किस्से ऐकल्याने उशिरा झोपणे काही तरी भारी भन्नाट असणार असेच कायम वाटत आले! एखाद कादंबरी असेल तर ती एका रात्रीत वाचून संपवली ह्याची मजा औरच! तसेच एखाद रात्रभर बसून मित्र मैत्रिणींशी गप्पा गोष्टी केल्या तर त्याची निराळी मजा! आणि मग स्वतःचा अभ्यास, व्यवसाय ह्यात इतरांच्या पुढे जायचे झाले तरी जागरण तर “कम्पल्सरी” असतेच! तर एकंदर विशीत झोप म्हणजे शत्रू इतपत प्रेमाचे नाते माझ्यात आणि झोपेत होते! मी केवळ चार तास झोपते आणि दमत देखील नाही, ही फुशारकी मारण्यात मला जो आनंद मिळायचा की त्याला तोड नाही!
२. पाणी कमी पिणे: पाणी पिणे एका वयानंतर “बोर” वाटू लागलं, म्हणजे कोण पिणार इतकं पाणी, आत्ता कामातून उठले तर पुन्हा लिंक लागणार नाही, काम झालं की एकदम बाटलीभर फ्रिजमधले पाणी पिते, म्हणजे असे मध्ये मध्ये परत लघवीला देखील जायला लागणार नाही. एका बैठकीत काम पूर्ण होईल आणि मी देखील अजून पुष्कळ काम उरकून घेईन! पाणी कशाला त्या पेक्षा कॉफी घेते, त्यात असतेच पाणी! असा वर विचार!
३. पाळी वेळेवर न येणे: अर्थात ही सवय कशी? हो ना? पण ही देखील एक सवयच, म्हणजे पाळी गोळ्या घेऊन येऊ देणे किंवा पुढे ढकलणे, सगळेच एकाच सवयीचा परिणाम! पाळीची अडचण वाटणे ही ती सवय! पाळी म्हणजे कटकट, पाळी म्हणजे वैताग, दुखणे आणि नसता खोळंबा! ह्या विचारांची सवय विशीत मला नक्कीच होती!
४. वेळी अवेळी जेवण: मला कोणी जर एक खोलीभर पुस्तकं दिली, अमर्याद इंटरनेट कनेक्शन दिलं आणि कोपऱ्यात एक मडकंभर पाणी देऊन मला कोंडून घातलं तर जगात माझ्याहून कोणी सुखी नसेल, हा माझा विचार मला खूप वर्ष पुरला! जेवण वगैरे सगळं उगीच कटकट असतं, जेवण्यात खूप वेळ वाया जातो आणि जेवण बनवण्यात तर फारच जास्त! स्त्रियांना घरात अडकवण्यासाठी केलेला हा खूप मोठा कट आहे, इतपत माझा जेवण, स्वयंपाक ह्याबद्दलचा दृष्टिकोण कलुषित होता! संपूर्ण ताटभर जेवण, भाजी, पोळी, भात वरण म्हणजे मोठी शिक्षा वाटायची मला! त्यात पालेभाज्या, उसळी म्हणजे अजिबात नको असेच वाटायचे मला! त्यातल्या त्यात बाहेरचे जेवण, चाटचे पदार्थ, तळलेले पदार्थ लाडाचे! मग सबवे सारखे सॅन्डविचवाले आले आणि भाज्या खात नाही, ह्याचे शल्य देखील पार धुवून निघालं! आणि रात्री तल्लफ आली की मॅगी आणि कुरकुरे किंवा तत्सम होतेच की!!
५. खूप जास्त काम ओढावून घेणे: ही सवय आहे हेच मुळी कळायला वेळ गेला! आपल्याला ज्या ज्या गोष्टींमध्ये गती आहे, त्या सगळ्या एकाच वेळी करायच्या, त्यासोबत येणाऱ्या कालमर्यादा - डेडलाईन्स सांभाळायच्या आणि डेडलाईनच्या किती जवळ सुरु करून काम पूर्ण करतो ह्याचीच गंमत अनुभवायची! हा सगळा अगदीच चुकलेला हिशोब कसा योग्य आहे, आपण कसे हे सगळे व्यवस्थित मल्टीटास्क करतो ह्याचाच अभिमान बाळगायचा! सतत सगळ्यांची आणि सगळ्या बाबतीत स्पर्धा करायची आणि ती स्पर्धा अनेकदा जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा हीच ती सवय!
६. कॉफी आणि कॅफिन: जागं राहायला, सतत एनर्जी राखण्यासाठी कॉफी! कॉफी व्यसन असावं इतकी! कारण चहा आवडत नाही, कॉफी कारण ती जास्त ग्लॅमरस आहे असेच वाटे! करकरीत कोरी कॉफी, त्यात जेमतेम पाव चमचा साखर आणि दूध अजिबात नाही! अगदी कडुशार अर्कच जणू! इतकी कडू कॉफीच लाडाची होती, जणू तिच्यामुळेच एक किक बसत असे! कॉफीचे अनेक कप रिचवत रिचवत काम करायचे आणि मग आपण कसे उत्तम मल्टिटास्क करतो म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची!
७. सुट्टी घ्यायची नाही: सुट्टी, रजा, विश्रांती जणू शिव्या शाप वाटायचे मला! म्हणजे सुट्टी कशाला हवी? चोवीसतास बारा महिने काम काम! आत्ता तर वेळ आहे, हीच तर वर्ष आहेत आणि हाच तर उद्देश आहे तरुण असण्याचा, खूप कष्ट करायचे आणि मग चाळीशी नंतर आराम! लवकर रिटायर व्हायचं असेल तर विशीत आणि तिशीत वेड लागल्यासारखं काम तर करायलाच हवं, हीच तर वर्ष आहेत प्रचंड मेहनत करण्याची! कारण मग लग्न, संसार ह्यांची सक्तीची विश्रांती आणि सगळ्या वेग कमी होण्याच्या घटना घडणार आहेतच असा एक डोक्यात पक्का विचार होता!
८. अवांतर सवयी: ह्या सात सवयी जरा जास्तच ठळक आठवतात, त्या वितिरिक्त बाहेरचे जेवण, शून्य व्यायाम, विना मोजमाप कॉम्पुटरवर अनेक तास काम, सूर्योदय, सकाळचे ऊन वगैरे अजिबात न बघणं, प्रत्येक छोट्या मोठ्या आजारासाठी लवकर बरी करणारी औषधं फार चिकित्सा न करता घेणं आणि इतर लोकांशी जमेल तितका कमी संपर्क ठेवणं. जुने मित्र मैत्रिणी, हक्कानी कानउघाडणी करणारी मंडळी ह्या सगळ्यांपासून चार हात लांब राहणं, एकंदर दिवसाला वेळापत्रक नसलेलं जगणं जगणं!
ह्यातल्या अनेक सवयी शाळा संपता संपता ज्या लागतात त्या पुढे अनेक वर्ष तशाच सुरु राहतात, कारण आपण सज्ञान होतो म्हणजे तरी काय, नियम, शिस्त पाळायला लावणारी माणसं आयुष्यातून वगळली जाणं, स्वतःचे दिनक्रम, वर्षांचे नियोजन स्वतः करणं! स्वतःच्या सवयी स्वतः लावून घेणं आणि त्या पुढे आयुष्यभर तुम्हाला पोसणार असतात हे अजिबात न समजणं!
ही गोष्ट देखील जितकी माझी तितकीच असंख्य मुला मुलींची आहे! नव्या शतकात प्रवेश करणारी ही एक पिढी जिने अचानक स्वातंत्र्य अनुभवलं, उघडलेल्या बाजारपेठांचे, मुक्त व्यापाराचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुक्त वेळापत्रकाचे! इंटरनेट, आऊटसोर्सिंग ह्यामुळे अचानक आठ तासांची नोकरी चोवीस तासातले कितीही तास झाली, हे अनुभवणारी ही पहिली पिढी! अचानक वडिलांच्या रिटायरमेंटच्या वेळच्या पगाराची बरोबरी विशीत करणारी ही पहिली पिढी!
जगभरात प्रवास करून पैसे कमावू पाहणारी ही पिढी, घर सोडून सहज परदेशात वास्तव्य करणारी ही पिढी.
आईच्या हातचा सोडून जगभरातला भारी स्वयंपाक नुसती चाखणारी नाही, तर स्वतःच्या स्वयंपाक घरात करून बघणारी ही पहिली पिढी. अनेक नवीन जीवनशैलींसोबत स्वतःची जीवनशैली जोडू बघणारी ही पिढी!
प्रचंड महत्वाकांक्षा आणि त्याची किंमत मोजायला बेफिकिरीने तयार अशी ही पिढी.
तर ह्या पिढीच्या मुलींचे नेमके काय झाले, ह्या त्यांच्या सवयींचे काय झाले हा एक मोठा रंजक प्रश्न आहे. आजही थोड्या फार फरकाने हेच आयुष्य, ह्याच सवयी घेऊन जवळ जवळ वीस वर्ष जगून आलेल्या मुलींचे काय झाले? मध्यवयीन होता होता ह्या सर्व सवयींचे परिमार्जन कशात झाले, ह्याचा अगदी जवळून वेध आपण घेणार आहोत, खूपशा गोष्टी जाणवतील, काही खटकतील, कधी आश्चर्य वाटून जाईल तर कधी खेद!
जागितिकीकरण, आंतरजाल, व्यवसाय, महत्वाकांक्षा, स्त्री पुरुष समानता ह्या सगळ्या संकल्पनांचा पट जरी असला तरी त्या सगळ्यात जे शरीर आपल्या सोबत आहे, त्याला ह्यातले काय काय उमजते आहे? कोणकोणत्या घटना, सवयी ह्या शरीरावर काय परिणाम करत आहेत, हे समजून घ्यायची आता वेळ आली आहे. मुळात नसलेल्या सवयींचा वेध घेऊन मग ह्याच्या दूरदर्शी परिणाम आणि शरीरावर उमटणारे पडसाद ह्याचा वेध घेऊ या!
कारण प्रत्येक सवय हे एक बीज आहे, ज्याचे फलित आपल्या समोर येणार आहेच!
प्राजक्ता पाडगांवकर